मतदार नोंदणीसाठी २ व ३ मार्चला ८५-भोकर विधानसभा मतदार संघात विशेष मोहीम राबवणार :उपविभागीय अधिकारी
पवन चांडक
नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी
भोकर (एजास कुरेशी)
भोकर दि. 28 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या ८५-भोकर विधानसभा मतदार संघात नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार २ व रविवार दि. ३ मार्च २०१९ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे,अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांनी दिली आहे.
दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने नुकतीच दि. २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. तथापि, या मोहिमेवेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सर्व अर्ज उपलब्ध
या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. ६, ७, ८ व ८अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
वेबसाईट व टोल फ्री क्रमांक
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीwww.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
राजकीय पक्षांनाही विनंती
या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे अशी विनंती देखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक-२०१९ करिता नव मतदारांना शेवटची संधी आहे. त्यामुळे या विशेष मोहिमेचा नव मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करुन घ्यावे...असेही आव्हान पवन चांडक (मतदार नोंदणी अधिकारी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment