पुण्यात शुक्रवार पेठेमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार, कोयत्याने केले वार.
File photo
प्रचंड वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या शुक्रवार पेठेतील शिंदे आळी येथे भर दुपारी एका तरुणावर पिस्तूलमधून धाड-धाड चार गोळ्या झाडल्या. तसेच कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भर रस्त्यात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. जखमी तरुणाने हल्लेखोरांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगेश धुमाळ (वय 32, शिंदे आळी, शुक्रवार पेठ) असे यामध्ये जखमी झालेल्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास धुमाळ हा शिंदे आळी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम समोर उभा असताना त्याच्यावर दोघांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली, यात त्याच्या डोक्यावर जखम झाला. त्यानंतर त्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्याला लागल्याने तो जखमी झाला. भर रस्त्यामध्ये झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करून घेत धुमाळ यांनी थेट खडक पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना हा प्रकार सांगतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर धुमाळ याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली आहे.या घटनेची माहिती कळताच गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवलीजात आहे. धुमाळ याचाही गुन्हेगारी रेकार्ड असल्याने हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाल्याची शक्यता आहे.













