लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” :- विनोद तावडे
नांदेड :-एजास कुरेशी
विधानसभा निवडणूक लढवण्यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी राजकीय सल्ला देत टीका केली आहे. “लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” असा सल्ला देत “राज्यातील कुठल्याही मतदारसंघात चव्हाण उभे राहिले तरी हरतील, अशी टीका तावडे यांनी केली.
आज नांदेडमध्ये मिडीया सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी विनोद तावडे आले होते. राज्यात सात मिडीया सेंटर तयार होणार असून एका मिडीया सेंटरच्या अंतर्गत 22 ते 35 विधानसभा मतदार संघ येणार आहेत. त्याद्वारे जनतेच्या प्रत्येक घरापर्यंत भारतीय जनता पार्टीने मागील पाच वर्षात केलेल्या विकासात्मक कामांचा आराखडा पुन्हा एकदा पोहचविण्याची जबाबदारी या सात मिडीया सेंटरवर असेल हे सर्व मिडीया सेंटर राज्याच्या केंद्रीय मिडीया सेंटरशी जोडले जाणार आहेत. नांदेडच्या मिडीया सेंटर अंतर्गत नांदेडच्या 9, लातूरच्या 6, हिंगोलीच्या 3 आणि उस्मानाबादच्या 4 अशा एकूण 22 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार राम पाटील रातोळीकर, प्रविण साले, व्यंकटेश साठे आदींसह अनेक भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी विनोद तावडे पुढे म्हणाले की, मी येथे आलोच म्हणून अशोक चव्हाणांना सल्ला देवू इच्छीतो की, त्यांनी विधानसभा निवडणुकीमधील भोकर विधानसभा लढवू नये कारण या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसारखाच रिप्ले होणार आहे. त्यामुळे झाकली मुठ झाकलीच राहू द्या असा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देत विनोद तावडे यांनी ती झाकलेली मुठ पुढे कधी तरी कामाला येईल असे सांगितले. या निवडणुकीत अशोक चव्हाणांनी 288 जागांपैकी कोठेही निवडणुक लढली तर त्यांचे जे होणारे तेच होणार असे सांगितले. भारतीय जनता पार्टीमध्ये मोदींचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपला हातभार लागावा अशी इच्छा ठेवणारे कार्यकर्ते जास्त असून विधानसभा निवडणुकीचे तिकिट मागणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे अशी माहिती दिली. मराठवाड्यातील महसुल आयुक्तालय नांदेडला सुरू झाले नाही याबद्दल प्रश्न विचारला असता तावडे यांनी ज्यांनी निर्णय घेतला त्यांनीच का अंमलात आणला नाही असा प्रतिप्रश्न विचारत योग्यवेळी आयुक्तालयाचा निर्णय घेवू असे सांगितले. भारतीय जनता पार्टीच्यावतीने अनेक मुस्लिमांना विधानसभेमध्ये टिकीटे दिली जाणार असल्याचे विनोद तावडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

No comments:
Post a Comment